'सत्यशोधक’ चळवळ आणि आजचे वास्तव


 ‘सत्यशोधक’ चळवळ आणि आजचे वास्तव

        महात्मा जोतिराव फुलें व सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजाच्या मूक, शोषित आणि वंचित घटकांसाठी झोकून दिला. व जातीयभेद, अंधश्रद्धा आणि गुलामगिरीच्या बेड्यांना मोडीत काढण्यासाठी लढा उभा केला तो लढा मानसिकतेतल्या भूमिकांचा मूलगामी बदलाचा आणि पुरोगामीत्वाचा होता आणि रूढीवादिंच्या प्रवाहाविरुद्ध चा लढा त्यांनी उभा केला आणि ‘सत्यशोधक समाजाचे’ स्वप्न पहिले. म्हणजे अशी समाजरचना, जिथे मनुष्य जन्माला आला आहे म्हणूनच त्याला मानवासारखे वर्तन कोणताही भेदभाव असणार नाही हाच पहिला आणि शेवटचा निकष असेल. पण आज जेव्हा आपण हे स्वप्न आणि आजचे वास्तव यांची तुलना करतो, तेव्हा एक भयंकर विसंगती डोळ्यांसमोर उभी राहते.

         फुलेंच्या काळातील सामाजिक विषमतेचे स्वरूप उघडे होते. जाती, वर्णव्यवस्था, स्त्रियांवर होणारा अत्याचार हे सगळे जीवनाच्या पृष्ठभागावर होते. आज ती विषमता एका अधिक अवघड, सूक्ष्म आणि राजकीयदृष्ट्या संरक्षित स्वरूपात अस्तित्वात आहे. जातीय संघटनांची राजकीय फळी, निवडणुकांचे व मतदानाचे समीकरण, आरक्षणावरची चर्चा, हे सगळे एका अशा सामाजिक व्यवस्थेचे द्योतक आहेत, जिथे जात ही एक ‘राजकीय चलन’ झाली आहे. आणि महात्मा फुलेंना श्रद्धांजली म्हणून जातीयतेचा विरोध करण्याऐवजी, राजकीय भांडवल म्हणून वापरली जाते. हीच या समाजव्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

        महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी केवळ रूढी परंपराच नाही तर मानसिकता बदलण्यावर त्यांनी भर दिला पण आजच्या युगात, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या साह्याने मनं प्रभावित करण्याचे प्रयत्न होत आहे आणि खरा संवाद संपू पाहतो आहे. आणि त्यामुळे स्वतःच्या बुद्धीचा कस सोडून सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमाच्या समोर विचारलं क्षमता संपली आहे आणि सत्य काय आहे त्याचा शोध घेण्याचा किंवा त्याचा विचार सुद्धा आज आम्हाला करावयाचा नाही त्यामुळेच ‘सत्यशोधक’ ही संज्ञा केवळ एक ऐतिहासिक चळवळ राहिली आहे. तिचा मूळ आत्मा – स्वतःच्या बुद्धीने सत्याचा शोध घेणे – हा विचार आपल्या शैक्षणिक पद्धतीतून, सार्वजनिक चर्चेतून कुठेही दिसत नाही. त्याच कारण म्हणजे आजचे शिक्षण व्यवसायापुरते मर्यादित झाले आहे, तर फुलेंचे शिक्षण हे मानव मुक्तीचे साधन होते.

स्त्रि सक्षमीकरण हा ज्योतिबांचा व सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. सावित्रीबाई फुलेंना भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून आदर दिला जातो. पण आज, जेव्हा आपण महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची, हुंडाप्रथेची, नोकरी आणि शिक्षणातील असमानतेची आकडेवारी बघतो, तेव्हा लक्षात येते की सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या या लढ्याचा शेवट अजून खूप दूरवर आहे. 

मग, प्रश्न उरतो – काय करावे?

फुलेंचे आदर्श आपण केवळ पुस्तकांतून आणि भाषणांतून काढून, आपल्या दैनंदिन आचरणात आणले पाहिजे. त्यांचा ‘सत्यशोधक’ दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे. आणि तो कसा ,

  • वैयक्तिक पातळीवर: आपल्या मनातील जातीय व लैंगिक पूर्वग्रह पूर्वापार आहेत त्यावर विजय मिळवणे. असमानतेवर मौनता ठेवण्याऐवजी आवाज उठवणे.
  • सामाजिक पातळीवर: शिक्षणाचे स्वरूप बदलणे. केवळ नोकरीमुळे नव्हे, तर चांगले, बुद्धिमान आणि संवेदनशील नागरिक घडविण्यासाठी शिक्षण द्यावे. स्त्रिया, दलित, आदिवासी यांसारख्या वंचित घटकांचे ख-या अर्थाने सक्षमीकरण करणे.
  • राजकीय पातळीवर: जातीय राजकारणाला विरोध करणे. अशा नेत्यांना आणि पक्षांना मतदान करणे, जे सर्व समाजघटकांच्या एकात्मिक विकासावर भर देतात.

महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुलेंची चळवळ भविष्यातील भारतासाठीचा एक रोडमॅप होता. आणि आपण तो रोडमॅप हातात घेतला नाही, तर फक्त भाषणे देण्यापुरते मर्यादित राहिलो तर ज्योतिबांना व सावित्रीबाई फुलें या क्रांतिसूर्यांना दिलेली ही आदरांजली खोटी ठरेल. त्यांनी सुरू केलेला ‘सत्यशोधक’ प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. कारण, जोतिबांचे स्वप्न व स्त्रीयाच्या मुक्तीदात्या व शिक्षणाच्या महामेरू सावित्रीबाई फुले यांना खऱ्या अर्थाने आजच्या जयंती दिनानिमित्त मान वंदना दिल्यासारखे होईल.

 दिन दुबळ्यांची मायमाऊली आणि लाखो स्रियांची सावली सावित्रीबाई फुलें यांना कोटी-कोटी प्रणाम!


👉 आमच्या आपले कायदे ब्लॉग ला भेट द्या कायदेशीर माहिती मिळवा!

No comments

Powered by Blogger.